सावदा पोलिसांची मोठी कारवाई; साडेदहा लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक
विमल पानमसाला, सुगंधित तंबाखूसह होंडा अमेझ कार जप्त
सावदा. ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकास सावदा पोलिसांनी तांदलवाडी फाट्यावर कारवाई करत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५० वाजता सावदा पोलिसांना राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून (क्र. MH-19-CV-4445) प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला.
रात्री सुमारे ११.०४ वाजता संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याची चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे समोर आले. दोन पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे आढळून आली.
५ लाख २७ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित माल
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विमल पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची एकूण ५ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीची पाकिटे जप्त केली. तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कार, किंमत ५ लाख रुपये, पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारे एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भुसावळ-वरणगाव परिसरात विक्रीसाठी माल आणल्याची माहिती
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०२२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, १०६, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका/४६८ निलेश बाविस्कर आदींनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.


