बीअर बारमध्ये अवैध दारू विक्रीचा व्हिडिओ काढल्याने संताप ; यावल तालुक्यात सरपंचाकडून हवेत गोळीबार
यावल, मंडे टु मंडे न्युज |कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे घडली. बीअर बारमध्ये सुरू असलेल्या देशी दारूच्या कथित अवैध विक्रीचे चित्रीकरण केल्याच्या रागातून दारूच्या नशेत असलेल्या सरपंचाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सरपंचाला शुक्रवारी पहाटे अटक केली.
डांभुर्णी शिवारातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हावी गावचा सरपंच विकास सोलंके (वय ३७) याचा डांभुर्णी येथे बीअर बार आहे. गुरुवारी रात्री गावातील दोन तरुणांनी या बारमध्ये देशी दारूची कथितपणे अवैध विक्री सुरू असल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
व्हिडिओ चित्रीकरणाच्या कारणावरून विकास सोलंके आणि संबंधित तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर सोलंके याने जवळील देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गोळीबारानंतर पोलिसांची तातडीने कारवाई
गोळीबाराची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवत शुक्रवारी पहाटे विकास सोलंके याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे

