भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मोठी कारवाई : गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वकार शेख जब्बार शेख (वय ३२) व धीरज मिश्रा (दोघे रा. शाहूनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला एमआयडीसी परिसरातील एम-१२४ सेक्टरमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहआयुक्त (अन्न) दिनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके व आकाश बोराडे यांच्या पथकाने संबंधित गोदामावर छापा टाकला.

तपासणीदरम्यान गोदामातून ‘गोवा गुटखा’ची ४,८०० पाकिटे जप्त करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी ७५ पाऊच असलेली ३,३०० पाकिटे आणि प्रत्येकी २६ पाऊच असलेली १,५०० पाकिटांचा समावेश असून, जप्त मालाची अंदाजे किंमत १२ लाख १५ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा प्रतिबंधित गुटखा भाडेतत्त्वावरील गोदामात साठवून ठेवल्याचे समोर आले आहे. या अवैध साठ्यामध्ये गोदाम मालकाचा कोणताही सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.तसेच, या गुटखा साठ्यामागील विक्रेते, पुरवठादार, उत्पादक आणि इतर संबंधितांचा शोध घेऊन संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध गुटखा विक्रीमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या धडक कारवाईनंतर जळगाव शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा साठेबाजांविरुद्ध पुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!