भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगावात पोलिसांची मोठी कारवाई! ११ चोरीच्यादुचाकींसह ३ सराईत चोरटे जेरबंद; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज |जळगाव शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तीन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी ११ चोरीच्या दुचाकी जप्त करून तीन सराईत चोरट्यांना अटक केली असून, सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यासह इतर भागांतील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.


पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाढत्या वाहनचोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपास मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.


जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत ७ चोरीच्या मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या वाहनांची किंमत सुमारे २ लाख २० हजार रुपये असून, जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल तसेच मध्य प्रदेशातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.


दुसऱ्या कारवाईत उमेश प्रदीप पाटील (रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ७५ हजार रुपये आहे.


तर तिसऱ्या कारवाईदरम्यान पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या कैलास वसंतदास मथुरे (रा. जुनोने, ता. जामनेर) याच्याकडून एक चोरीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली. तपासात हे वाहन औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी सोयगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!