भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसावदा

नागरिकांच्या तक्रारींची आ.अमोल जावळे यांच्याकडून दखल; भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी गैरहजर, जिल्हा अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस

सावदा.ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || खिरोदा मंडळाच्या सिटी सर्व्हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने आमदार अमोल जावळे यांनी कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. संबंधित अधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे रखडतात, तसेच कामासंदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आमदार जावळे यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली असता संबंधित अधिकारी कर्तव्यावर असतानाही कार्यालयात गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत आमदार जावळे यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव यांनी संबंधित अधिकारी श्री. शशिकांत रमेशचंद्र ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

श्री. ठाकरे हे खिरोदा प्र. यावल येथील परिरक्षण भूमापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या शासकीय कामाच्या अनुषंगाने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र, आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट दिली असता ते कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले. तसेच मागील दोन ते तीन दिवसांपासून ते कार्यालयात हजर नसल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव यांनी संबंधित अधिकाऱ्याला तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार पुढील शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत होणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे आणि नागरिकांना योग्य सहकार्य करणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या अचानक पाहणीमुळे भूमी अभिलेख विभागातील या प्रकाराची प्रशासकीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!