राज्यात मान्सून सक्रीय ; राज्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे मुसळधार पाऊस?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | अखेर संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील काही राज्यांना पूराचा धोका आहे. तर, महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासाच्या मुसळधार पावसानंतर पावसांने काहीशी उसंत घेतली. मात्र तरीही दिवसभरात पावसाचं सावट शहरावर कायम असल्याचे सांगत हवामान विभागानं ७ जुलै, अर्थात पुढील 24 तासांसाठी शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या वादळी सरींची शक्यता सुद्धा हवामान विभागानं वर्तवली आहे.
आणि याच पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवार, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे घाट परिसरात रेड अलर्ट, तर उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, आणि पुणे या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (काही ठिकाणी अत्यंत मुसळधार) पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ६०-७० किमी वेगाने वारे वाहतील.
तर जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर, आणि गोंदिया
या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून जोरदार पाऊस आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम पाऊस आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
राज्यभरात पावसाचा जोर कायम असताना नाशिक जिल्ह्यासह त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि लगतच्या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार कायम असल्याचे चित्र आहे. तर पुढील काही तासात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या त्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम असून रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज ७ जुलै रोजी त्रंबकेश्वर, नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यता आहे. परिणामी रात्रीपासूनच प्रशासन सतर्क झाले आहे
राज्यात कुठं कुठं कोसळधार?
राज्यात जळगाव,धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, वाशिम, वर्धा इथं पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला. पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यातील घाटमाथ्यावर पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं. ज्यामुळं कोकणासह राज्यातील घाटमाथ्यावर सध्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशभरात मान्सून सक्रीय
देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून, उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर इथंसुद्धा मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार ७ ते ९ जुलै:दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थानचा पूर्व भाग आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये सामान्यहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, १२ जुलैपर्यंत हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतीव पर्वतीय राज्यांमध्ये हिमवृष्टीसुद्धा नाकारता येत नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


