अकोल्याच्या सौ. नीता यशवंत वायकोळे यांना पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
अकोला, मंडे टु मंडे न्युज. नेटवर्क | अकोला येथील सौ. नीता यशवंत वायकोळे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठान,नीती आयोग भारत सरकार,मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ उद्यम मंत्रालय संलग्नित व पूजनीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आरंभीत नीती आयोग भारत सरकार संलग्नित व राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्यवतीने उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, पुणे येथे 27 एप्रिल2026 रोजी झालेल्या समारंभात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे, खादी व ग्रामोद्योग मंत्री श्री रविंद्र साठे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
सौ. नीता वायकोळे या महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या महिला उपाध्यक्ष (विदर्भ विभाग) असून, दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला यांच्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. गरजू, अनाथ मुलामुलींसाठी विविध प्रकारे मदत करणे, दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करणे तसेच गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
रॉबिन हूड आर्मी या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेद्वारे त्या ज्ञानदान, अन्नदान व वस्त्रदान उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतात. जळगावमधील वरणगाव हे त्यांचे मूळ गाव असून, जळगाव व महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांशी त्या संलग्न आहेत. तसेच त्या सकल लेवा महिला मंडळ भुसावळ यांच्या अधिकृत सदस्य पण आहेत.
या पुरस्काराबद्दल बोलताना सौ. नीता वायकोळे यांनी आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि संस्थांचे आभार मानले. त्यांच्या सामाजिक कार्यात पती यशवंत वायकोळे, मुलगा कुशल, सून उर्मी, मुलगी राजश्री, जावई गिरीश बऱ्हाटे, भाची अमृता पाटील, पुतण जावई डॉ. दिपक लोखंडे तसेच अन्य नातेवाईक आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. रॉबिन हूड आर्मी अकोला टीम आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ.विशाल कोरडे सर यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. भविष्यातही निस्वार्थ भावनेने समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सौ. नीता वायकोळे यांनी यावेळी नमूद केले.
