नशिराबाद येथे झिपरू अण्णा मंदिराजवळील स्मशानभूमीची दुरावस्था ; ऑक्सिजन पार्कसाठी नागरिकांची मागणी
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | येथील झिपरू अण्णा मंदिरालगत असलेली जुनी स्मशानभूमी सध्या दुरावस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. नदीकाठावर वसलेल्या या जागेचा योग्य वापर होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, सद्यस्थितीत स्मशानभूमी परिसरात स्वच्छतेचा अभाव असून कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता वाढली आहे. उष्णतेचा वाढता प्रभाव आणि झाडांची झालेली मोठ्या प्रमाणात कत्तल यामुळे परिसर अधिकच उघडा आणि कोरडा झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ही जागा वाकी नदीकिनारी असल्यामुळे येथे सुशोभीकरण करून ऑक्सिजन पार्क विकसित करता येऊ शकतो. अशा प्रकल्पामुळे परिसरातील घाणीचे निर्मूलन होऊन नागरिकांना स्वच्छ व हिरवळयुक्त वातावरण मिळेल, तसेच पर्यावरणालाही मोठी मदत होईल.
झिपरू अण्णा महाराजांचे मंदिर याच परिसरात असल्याने येथे भाविकांची सतत वर्दळ असते. जर परिसर स्वच्छ व सुशोभित केला गेला, तर येणाऱ्या भाविकांनाही चांगला अनुभव मिळेल आणि परिसराचे सौंदर्यही वाढेल. यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून येथे ऑक्सिजन पार्क उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
