माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच, ६ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच होणार आहे.
१०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.