राज्यात 15 जून पर्यंत निर्बंध कायम-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. मात्र काही जिल्ह्यांत रुग्णवाढ अद्यापही असल्याने राज्य सरकारने 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाची प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन १ जूनपर्यं कऱण्यात आला होता. परंतु लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवून १५ जूनपर्यंत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद साधत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यासंबंधीची घोषणा केली आहे. तर राज्यातील लॉकडाऊन एकदम न उठवता टप्प्या-टप्प्याने उठवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाईल यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी किंवा जास्त असेल त्यापद्धतीने लॉकडाऊनमधील शिथिलतेबाबत ठरवण्यात येईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात अद्याप कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नसल्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांवर निर्बंध लादणे यासारखे कटू काम दुसरे असूच शकत नाही असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण आणत आहोत. राज्यातील निर्बंध हे पुढील १५ दिवस वाढवण्यात येत आहे. जिल्ह्यानुसार आढावा घेऊन काही जिल्ह्यातील निर्बंध शिथील तर काही जिल्ह्यातील कडक करण्यात येणार आहे. काही जणांकडून कुरबुर सुरु आहे की, हे उघडा ते उघडा अन्यथा कोरोना बिरोना आम्ही बघणारच नाही. त्यांना विनंती करतो की असे करु नका मला पुर्ण माहिती आहे की, संकट विचित्र आहे. कोरोनाचे संकट कमी झाले असल्यामुळे रस्त्यावर उतरु नका आणि जर उतरलाच तर कोरोना योद्धे म्हणून उतरा कोरोना दुत म्हणून उतरु नका असा सज्जड इशारा आणि आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.