कोरोनाची चौथी लाट येण्याचे संकेत,केंद्र सरकारने दिला इशारा!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून भारतात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले असल्यामुळे अनेक राज्यांनी कोरोनाचे निर्बंध हटवले आहेत. तसेच महाराष्ट्रही मास्कमुक्त झाला आहे.
तसेच आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेला तोंड देण्यासाठी व्यवस्था सुरू करण्यात आली असून सरकारने अलर्ट जारी केला आहे. तसेच आरोग्य व्यवस्थापकांना विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
वेगवेगळ्या आलेल्या अहवालांनुसार भारताता कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यानुसार भारतात काळजी घेण्यास सागितले जात आहे. नोएडा, दिल्ली, मुंबई वाढलेल्या रुग्णामुळे काही दिवसात रुग्ण वाढु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. १० ते ७० पट संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन एक्स ई (Omicron XE) व्हेरियंटवर डॉक्टरांनी कडक इशारा दिला आहे.
जगभरातील अनेक देशांसोबतच भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने लोकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तज्ज्ञ लोकांच्या निष्काळजीपणाला आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना जबाबदार धरत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या अडचणीही वाढल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे १००७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २३ कोरोनाबाधितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या २ दिवसात भारतात XE व्हेरियंटचा कोणताही नवा रुग्ण सापडलेला नाही. कोरोनाचा नवा व्हेरियंट XE संदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य तज्ञांची बैठक घेतली आणि पुढील नियोजनावर चर्चा केली. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना नवीन रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान कोरोनाच्या मागील लाटेप्रमाणेच पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जरी चौथी लाट आली तरी ती फार प्राणघातक ठरणार नाही, कारण मोठ्या संख्येने लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट जीवघेणी ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा