पत्रकारांवरील हल्ले ही सुसंस्कृत महाराष्ट्रात शोकांतिका – विरोधी पक्ष नेते अजित पवार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय काही पत्रकारांना जाणीवपूर्वक फौजदारी गुन्ह्यांमध्ये अडकविले जात आहे. हे प्रकार म्हणजे चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक केले जाणारे हल्ले आहेत. भविष्यात पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत,पत्रकारांवरील हल्ले हे सुसंस्कृत महाराष्ट्रातील शोकांतिका असल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, प्रकाशक चंद्रकांत भुजबळ, लेखक श्याम दौंडकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘राज्यात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाला वेगळे वलय आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. ही परंपरा महाराष्ट्राला शोभणारी नाही. कोकणात पत्रकाराची हत्या झाली.
मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दम दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये खोके या विषयावर रॅप सॉंग करणाऱ्याला कारागृहात टाकले. खोका हा उल्लेख केला तर, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. राज्यातील एक नेता पत्रकारांची चाय बिस्कीट पत्रकार अशी जाहीर वल्गना करत आहे.