भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीत महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांची उमेदवारी जवळपास निश्चित?राज्यातील २५ जागांवर चर्चा
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशभरातील सर्वच पक्षांचा उमेदवारी निच्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे . महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपची दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत. या बैठकीआधी भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांवर चर्चा झाली आहे. भाजपच्या विद्यमान २५ जागांवर आजच्या बैठकीत चर्चा झालीय. त्यानंतर आता उद्या भाजपची उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘या’ नेत्यांची उमेदवारी जवळपास निश्चित?
भाजपच्या आजच्या बैठकीत नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सांगलीतून संजयकाका पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालीय. या सह एकूण २५ जागांवर चर्चा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांकडून राज्यातील २५ जागांबाबतचं सादरीकरण करण्यात आलं आहे. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी भाजप ज्या मतदारसंघातून निवडणूक लढली होती, त्यापैकी जिंकलेल्या २३ आणि पराभवी झालेल्या चंद्रपूर आणि बारामती अशा २ जागांचं सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आलं. चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं. तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची दाट शक्यता आहे. आता इतर राज्यांची बैठक भाजपची केंद्रीय निवडणूक समिती घेत आहे. त्यानंतर कदाचित पुढच्या २४ तासात म्हणजे उद्या दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या सहा खासदारांना बदलण्याचे भाजपकडून संकेत
भाजपकडून शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम–यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावं आहेत.