अजित पवार गटाला मोठा धक्का! अत्यंत विश्वासू नेता शरद पवार गटात प्रवेश करणार
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके अशी लढत होणार हे नक्की झालंय. पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.
लंके यांच्या पत्नी सक्रिय
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामध्ये अहमदनगर मतदारसंघाची चांगलीच चर्चा आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत. आ. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत.