आता सर्दी, खोकला, तापाची औषधे मिळणार किरणा दुकानात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सर्दी, खोकला, ताप यासाठी वापरण्यात येणारी औषधे आता किराणा दुकानातही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यावर विचार सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल यांनी यासंबधीची तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीकडे भारताचे ओटीसी औषध धोरण तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याबाबतचा मसुदाही समितीने सादर केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुकानाच विकल्या जाणाऱ्या औषधांची यादीही देण्यात आली आहे. भारतात अद्याप असा कोणताही नियम नाही.
काय आहे OTC धोरण?
आता ओटिसी म्हणजे काय?ओटीसी म्हणजे ओव्हर द काउंटर म्हणजे अशी औषधे जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाऊ शकतात. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये हे धोरण आधीपासूनच लागू करण्यात आलेले आहे. आता भारतात त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. या दिशेने ही समिती काम करत आहे. या समितीने आतापर्यंत अनेक सूचना केल्या आहेत.
का आणले जात आहे हे धोरण?
अहवालानुसार, ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून सरकार हे धोरण आणण्याची तयारी करत आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय ग्रामीण भागात मेडिकल स्टोअर्सही देखील कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा स्थितीत अनेक वेळा लोकांना आवश्यक औषधेही मिळत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक औषधे वेळेवर न मिळाल्याने रुग्णांची स्थिती अधिकच गंभीर होते. यासाठी समितीने ओटीसीबाबत सूचना दिल्या आहेत. जर एखादे औषध केवळ प्रिस्क्रिप्शनसाठी सांगितले जात नसेल तर ते ओटीसी मानले जाते, जरी यासंबंधी कोणताही निश्चित नियम नाही. याला नियमांच्या कक्षेत आणून अत्यावश्यक औषधांची उपलब्धता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.