शिवसेना-भाजपची पुन्हा युती? राज्यात ठाकरे मुख्यमंत्री, केंद्रात फडणवीस
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची घटिका आता अगदी जवळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. साधारणतः पुढील दोन दिवसांत निश्चित मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जाते आहे. मोदी यांच्या विस्तारित टीममध्ये साधारणतः २० ते २१ नव्या नावांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जुना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेलाही संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका वृत्तवाहिनीच्या सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही क्षणी युतीचा घोषणा होऊ शकते. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला मंत्रिपद दिले जाणार आहे. तसेच राज्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. तर देवेंद्र फडणवीस केंद्रात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. तर भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील, असं सुत्राच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. भाजपमधील सुत्रांनी या वृत्ताचं खंडण केलं असून केंद्रातील मंत्रिमंडल विस्तार आणि राज्यातील घडामोडीचा संबध नसल्याचं म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. त्यावेळी केंद्रात जाणार का? या प्रश्नावर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली होती. फडणवीस म्हणाले होते, ‘भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतली तो अंतिम असेल. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णयाचा सन्मान केला जातो. पक्षाकडून मला विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ती जबाबदारी मी ताकदीनं निभावत आहे. मला वाटत नाही, दिल्लीत माझी गरज असेल. पण पक्षाचा निर्णय अंतिम असेल. ‘
शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, ही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ही नैसर्गिक युती ठरेल. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळेच शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा युती होण्याची शक्यता असल्याचं एका भाजप नेत्यानं NDTV ला सांगितलं. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये 25 वर्षांपासून युती होती. 2019 च्या निवडणुकीनंतर युती तुटली. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं.मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणांमध्ये बदलाचे वारे दिसत आहे. 8 जून रोजी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. तसेच नुकतेच संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यामध्येही मुंबईत भेट झाली. त्यानंतर संजय राऊत मागील काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका करताना दिसत नाहीत. मोदींसदर्भात संजय राऊत यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं सध्या दिसत आहे. या सर्व घटना घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीवारी केली. दिल्ली दौऱ्यांमध्ये मोदी आणि नड्डा यांच्यासोबत फडणवीस यांची बैठक झाली होती. या भेटीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्स होणार का? या चर्चेला उधाण आलं होतं.
सध्या मोदी मंत्रिमंडळामध्ये 53 मंत्र्यांचा समावेश आहे. संविधानानुसार जास्तीत जास्त 81 मंत्र्यांची नियुक्ती करता येते. या हिशोबाने सध्याच्या मंत्र्यांची संख्या पाहिल्यास आणखीन 28 मंत्र्यांना संधी दिली जाऊ शकते. लोकसभेच्या पावसाली अधिवेशनापुर्वी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये कोणत्या राज्याला किती मंत्रिपदे मिळतात, तसेच शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का? याबाबतच्या चर्चेला उधान आलं आहे.