भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

SSC-HSC Exam : ‘कॉपीमुक्त’चा नांदेड पॅटर्न राज्यभरात

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाचा नांदेड पॅटर्न राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी नांदेडचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी २००९ मध्ये हा पॅटर्न राबविला होता. 

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतील. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी पत्र परिषद घेऊन परीक्षेबाबत जनजागृती करतील. हे अभियान २००९ नांदेड जिल्ह्यात राबविले आणि पुढच्या वर्षी (२०१०) मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या निकालाचा टक्का मोठ्या प्रमाणात घटला; पण त्यानंतरच्या प्रत्येक वर्षांत तो मोठ्या प्रमाणात वाढला. कॉपीवर नियंत्रण आले आणि निकालाचा टक्काही वाढला होता. मार्च २००९मध्ये सामूहिक कॉपी करताना ३५०० मुला-मुलींना पकडण्यात आले होते. 

कॉपीमुक्त परीक्षांसाठी आधी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण संस्थाचालकांच्या कार्यशाळा घेण्यात येतील. जिल्हा दक्षता समितीमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदींचा समावेश असेल. पालकांशीही संवाद साधला जाईल.  परीक्षा केंद्रापासून ५० मीटरपर्यंत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही, परीक्षा केंद्रांचे अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि सर्वसाधारण असे वर्गीकरण, परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करणे, १०० विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती, पोलिस पाटील, कोतवाल, शाळा कर्मचाऱ्यांकडून मुलांची तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेतील महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी अशा उपाययोजना करण्यात येतील. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!