राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे,कोणाची लॉटरी, कोणाला डच्चू ? शिवसेना,राष्ट्रवादीतही रस्सीखेच
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यातही फेरबदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची एक एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ही जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, पक्ष श्रेष्ठी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शेख, पाडवींचं मंत्रिपद धोक्यात
खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना वगळण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि केसी पाडवी यांना काँग्रेसकडून डच्चू दिला जाऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.
पक्ष संघटन वाढवण्यावर जोर
नवे फेरबदल करताना तिन्ही पक्षांकडून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षाला उभारी देणाऱ्या आमदाराला मंत्रिपद दिलं जाणार असून ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, अशा भागातील आमदाराला नव्या विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
पटोले दिल्लीत
दरम्यान, राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत गेले आहेत. ते आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत गेले आहेत. ते आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
ताकद वाढवण्यासाठी फेरबदल
महाविकास आघाडीत छोटेसे बदल होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री येणार आहे. राठोड आणि देशमुखांच्या जागी एक मंत्री येणार आहे. पण त्याशिवाय काँग्रेसलाही काही मूलभूत बदल करायचे आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसला हे फेरबदल करायचे आहेत, असं राजकीय विश्लेषक संजय आवटे यांनी सांगितलं. भाजप अस्थिर असल्याची चर्चा असलं तरी महाविकास आघाडीने भाजपचं हे आव्हान परतवून लावलं आहे. मंत्रिमंडळाचा फेरविस्तार होणं हाच सरकार स्थिर असल्याचा महत्त्वाचा पुरावा आहे. काँग्रेस पक्ष संघटनेच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहे. सरकार आल्यानंतर केवळ 12 मंत्र्यांनाच फायदा झाला. संघटनेला फायदा झाला नाही. त्यामुळेच संघटनेला फायदा होईल आणि केंद्र संघटन केंद्रभूत ठेवून हे फेरबदल करण्यावर काँग्रेसचा भर असेल असं आवटे यांनी स्पष्ट केलं.
सतेज पाटलांना बढती मिळणार?
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात बढती मिळण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या गृहराज्य मंत्रिपद आहे. मात्र त्यांना आता काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाऊ शकते. केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, इकडे राज्यातही हालचाली सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे. याचवेळी मंत्रिमंडळ विस्तार होऊन सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्री केलं जाऊ शकतं.
सध्या काँग्रेसच्या वाट्यात असलेल्या मंत्रिपदांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात केवळ एक मंत्रिपद दिलं आहे. नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री आहेत. मात्र नगर जरी पश्चिम महाराष्ट्रात येत असलं तरी त्याचं महसुली क्षेत्र नाशिक विभागात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने कॅबिनेट मंत्रिपदच दिलेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात वगळता दुसरा कॅबिनेट मंत्री नसल्यानं सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सतेज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, गोकुळ निवडणुकीत मिळविलेल्या यशाचे पालकमंत्री सतेज पाटील यांना बक्षीस देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं
ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 15-13-12 अशी मंत्रिपदं आहेत.