खिडकीचे लोखंडी गज कापून घरफोडी : १३ लाखांचा ऐवज लंपास !
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, प्रतिनिधी : शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्यातील शरद बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज कापून बंगल्यात प्रवेश करून १३ लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी सुंदर दत्ताराम भुसारे (वय ४२,) रा. येवलेकर मळा, संजय दशपुते यांचे वॉचमन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की चोरट्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील उत्तर बाजूला असलेल्या लोखंडी खिडकीचे गज कापून खिडकीतून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून दहा लाख रुपयांची रोकड, २ लाख ५० हजार रुपयांचे १० ते १५ तोळे सोन्याचे दागिने त्यात सहा नग बांगड्या, दोन सोन्याची मंगळसूत्रे, सोन्याचा एक क्वॉईन, दहा हजार रुपयांचे दहा भार चांदीचे भांडे, पाच हजार रुपयांचे डीव्हीआर मशीन, दोन हजार रुपयांचा एक हॅण्डी कॅमेरा, एक हजार रुपयांची दुर्बिण असा एकूण १२ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे अधिक तपास करीत आहेत.