ऑपरेशन ‘लोटस’ : शिंदें शिवसेनेचे ३५ आमदार फुटणार, दाव्याने राज्यात खळबळ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |भाजपने शिवसेनेच्या फुटीनंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन लोटस सुरू केले असून त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडत असल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी तीन दिवसांपूर्वी केली होती. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. मात्र, या भेटीचा फायदा झालेला नाही. भाजप हा शिंदेंशिवाय निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून एकनाथ शिंदेंचे ३५ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
भाजपने एक पक्ष निर्माण केला आता त्याला संपवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने ऑपरेशन लोटस करून मूळ शिवसेना फोडली त्या फुटीचे सुत्रधार हेच शिंदे होते आता दुसऱ्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटावर घाला घालणे सुरू आहे, असा दावा देखील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी जी नीती वापरून लोकं फोडली तीच नीती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वापरत आहेत. पाच,पंचवीस लाख देऊन शिंदेंनी माणसं फोडली आणि आता चव्हाण होलसेल भावात ती माणसं विकत घेत आहेत. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाल्याचा दावा देखील ‘सामना’तून करण्यात आला आहे.
अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भेटीची खिल्ली देखील ‘सामाना’तून उडवण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, शिंदे यांनी शाहांकडे आपली माणसं पैसै देऊन फोडली जात असल्याची तक्रार केली. त्यावेळी शाहा यांनी हसून म्हटले की, ‘कोण कोणाचा पक्ष फोडत आहे. आम्ही तुमचा पक्ष फोडून बनवला आहे. तुम्ही फुटलात.’

