मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : कु.संजना पाटील-शिवसेना (शिंदे गट) – भावना महाजन- भाजप आमने सामने, खडसे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढत
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये अर्ज माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर आता नगराध्यक्ष पदाची लढत थेट सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यामध्येच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचेच दोन घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.
खडसे कुटुंब पुन्हा चर्चेत
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे शहरात अपेक्षित ताकद नसल्याचे मान्य करत निवडणुकीतून माघार घेतली. या निर्णयामुळे खडसे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना दिसत असली तरी, यामुळे भाजपला नगराध्यक्ष पदाच्या लढतीत मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ही निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील प्रतिष्ठेचा आणि राजकीय प्रभावाचा कस लावणारी ठरणार आहे.
माघारीचे नाट्य : विरोधक झाले कमी
नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांपैकी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मैदानात आता फक्त दोनच मुख्य उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे निवडणूक अधिक थेट, अटीतटीची आणि रोखठोक होणार हे निश्चित झाले आहे.
नगरसेवक पदासाठी दुहेरी आणि तिरंगी लढती
नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवक पदांच्या लढतीतही माघारीनंतर नवे समीकरण तयार झाले आहे. विविध प्रभागांमधील एकूण ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काही प्रभागांत मुख्य दोन पक्षांमध्ये सरळ सामना होणार आहे. तर काही प्रभागांत अपक्षांची ताकद कायम राहिल्याने तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे रणनिती, मतांची विभागणी आणि गटबाजी हीच या स्पर्धेतील निर्णायक ठरणार आहे.
महायुतीतील मैत्रीचे प्रतिस्पर्ध्यात रूपांतर
मागील काही निवडणुकांमध्ये एकजूट दाखवणाऱ्या महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांनी यावेळी मुक्ताईनगरमध्ये एकमेकांविरोधातच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार आणि चर्चेचा विषय ठरणार आहे.
माघारीनंतर मुक्ताईनगरमधील निवडणूक थेट द्विपक्षीय झाली असून, ही लढत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या राजकीय गटांचे स्थानिक पातळीवरील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराचे तापमान आणखी वाढणार असून, मुक्ताईनगरकरांचे लक्ष या प्रतिष्ठेच्या लढतीकडे केंद्रीत झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी माघार
- वैशाली अशोक जावरे – अपक्ष
- फाहेंमुनीसा यासीन खान – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- भाग्यश्री अजय जैन – शिवसेना (उभाठा)
नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय माघार
प्रभाग क्र. 3 : योगेश अशोक काळे
प्रभाग क्र. 6 : करुणा पियुष हळदे
प्रभाग क्र. 8 : अश्विन अनिल सुरवाडे
प्रभाग क्र. 10 : निलोफर शाहरुख खान
प्रभाग क्र. 13 :
गणेश गोविंदा तेली
गणेश दामोदर महाजन
प्रभाग क्र. 14 :
रितेश नगीनचंद जैन
स्वप्निल विलास पाटील
प्रभाग क्र. 16 : कल्पना अविनाश बोरसे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
