यावल तालुक्यात मोराची शिकार, मृत मोरांसह दोघांना अटक
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातून ५ मृत मोर व १ बंदूक, चाकूसह इतर साहित्यासह दोघांना अटक करण्यात आली असून ही घटना यावल तालुक्यातील वानोली शेत शिवारात वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ५ मृत मोर व १ बंदूक, चाकूसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. या दोघांना न्यायालयाने ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, ३१ ऑगस्ट रोजी ९.३० वाजेच्या सुमारास फैजपूर येथील वनपाल मिळालेल्या माहितीवरून फैजपुर रॉऊन्ड स्टाफ व वन कर्मचाऱ्यांसह यावल तालुक्यातील वनोली शिवारात गेले असता त्यांना बंदुकीच्या फायरिंगचा आवाज आला. हा आवाज येताच ते सर्व आवाजाच्या दिशेने धावले. व परिसरात शोध घेतला असता दोन व्यक्ती संदिग्ध अवस्थेत दिसून आले. त्यांना पथकाने जागीच रंगेहाथ पकडले.
या वेळी एका संशयित आरोपीजवळ १ बंदूक, २ चाकू, टॉर्च व १ दुचाकी असे शिकारीसाठी लागणारे साहित्य तसेच एका पोत्यात ५ मृत मोर पथकाला आढळले. ५ मृत मोर व शिकारीच्या साहित्यासह मारुळ येथील सलीम रुबाब तडवी व सय्यद अफसर अली मुश्ताक अली या दोघांना ताब्यात घेवून त्यांना चौकशीसाठी यावल येथे आणले आहे. या प्रकरणी बोरखेडा बुद्रुक येथील वनरक्षक यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. आज त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता आरोपी सलीम रुबाब तडवी व सय्यद अफसर अली मुश्ताक अली रा. मारुळ, तालुका यावल. यांना ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील तसेच वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूरचे वनपाल व रेंज स्टॉफ हजर होते. तर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यात मार्गदर्शनात तपास सुरु आहे.
