एक लाखांची लाच स्वीकारताना पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहात अटक, जळगाव एसीबी ची मोठी कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनमधील एका पोलीस नाईकाला लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना आज दिनाक १३ एप्रिल २०२६ रोजी घडली. विनोद पितांबर अहिरे . पो.ना/४० नेम शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगाव, रा. बिल्डिंग नं. ए-५, रूम नं ४० पोलीस लाईन, जळगाव असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने एका तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली.
तक्रारदार हे जळगाव येथील रहिवाशी असून तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अर्जाची चौकशी आरोपी अहिरे यांच्याकडे होती. या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तत्काळ याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज १३ एप्रिल २०२६ रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचांसमक्ष पुन्हा लाच मागणीची पुष्टी केली.
सापळा कारवाईत तक्रारदार शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात गेल्यानंतर, आरोपीने पोलीस स्टेशनच्या बाहेरच १ लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताच पथकाने पो.ना/४० विनोद पितांबर अहिरे, नेम शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगाव, रा. बिल्डिंग नं. ए-५, रूम नं ४० पोलीस लाईन, जळगाव. याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा (गु.क्र. १२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वात पार पडली. सापळा पथकात पोउपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल भुसवंशी यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.

