पोलिस दलाच्या पेट्रोल पंपावर जमा झालेले लाखो रुपये बँकेत न भरता पोलिस उपनिरीक्षक बेपत्ता
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव मध्ये पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत दक्षता पेट्रोल पंप चालविला जातो. या चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाची रक्कम हाताळण्याची जबाबदारी असलेले पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांनी दोन ते तीन महिन्यांपासून ही रक्कम बँकेत भरलेली नाही. त्यात आता ते चार दिवसांपासून बेपत्ता झाले असून तशी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा पेठ परिसरात पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. तेथे जमा झालेली रक्कम ही वेल्फेअर विभागाच्या बँक खात्यात जमा करावी लागते. त्यानुसार सध्या उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांच्याकडे दररोजची रक्कम हाताळण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र जमा झालेली रक्कम बँक खात्यात जमा करणे आवश्यक असताना वाघ यांनी दोन ते तीन महिन्यांपासून रक्कम खात्यात जमा केलीच नाही. एवढ्या दिवसात मोठी रक्कम जमा झाल्याचा अंदाज असून मात्र ११ फेब्रुवारीपासून वाघ बेपत्ता झाले आहेत.
११ फेब्रुवारी रोजी वाल्मीक वाघ हे घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांच्या मुलाने तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. घरातून जाण्यापूर्वी त्यांनी आपण घरातून जात असल्याचे मुलाला कळविले होते.
पेट्रोलपंपावरील रक्कम हाताळण्याची जबाबदारी असताना संबंधितांनी ती बँकेत भरलेली नाही.चार दिवसांपासून संबंधित व्यक्ती बेपत्ता असण्याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना कळविले असून तशी मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. पेट्रोलपंपावरील किती रक्कम वाल्मीक वाघ यांच्याकडे होती, हे स्पष्ट नसले तरी हा आकडा कोट्यवधींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमकी रक्कम किती आहे, याची माहिती घेण्यासाठी लेखापरीक्षण करण्यात येत असून त्यानंतर नेमकी रक्कम किती आहे, हे स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

