जुगार अड्ड्यावर छापा, १५ जुगारी ताब्यात, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत १५ जुगारींना कासोदा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावात गालापूर रोडलगत काटेरी झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी केली.
कासोदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी पथक तयार करून सापळा रचला. व दुपारी साडेतीनच्या सुमारास पत्त्यांचा डाव रंगत असतानाच पोलिसांनी धाड टाकली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनू धाकु भिल (५०), विरभान श्रावण भिल (४०), राहुल संतोष सोनवणे (२६), प्रवीण वसंत सोनवणे (३९), संतोष माधव सोनवणे (३०), सुनील दगा ठाकरे (३५), मंगिलाल भाईदास चव्हाण (४५), रतन धाकु भिल (६०), अशोक गोविंदा पाटील (५४), सचिन बापू पवार (३७), कांतीलाल महादू सोनवणे (३८), उत्तम बालाअप्पा जेढे (५०), समाधान बापू पाटील (३५), संभाजी महारु पाटील (५८) आणि सुनील सीताराम वाघ (४८) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी जवखेडे सिम (ता. एरंडोल) येथील रहिवासी आहेत.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ६ हजार ३९० रुपये रोख व १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कासोदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत , पो.ना. प्रदीप पाटील, पोकॉ. समाधान तोंडे, पोकॉ. निलेश नाना गायकवाड व पोकॉ. योगेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पोकॉ. ५०१ दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.


