फैजपूर परिसरात अवैध पत्ता जुगाराचा सुळसुळाट – पिंपरुळ शिवारात धाडसाने सुरू खेळ, पोलिसांवर प्रश्नचिन्ह
भानुदास भारंबे. मुख्य संपादक …
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज. | फैजपूर शहरालगत असलेल्या पिंपरुळ शिवारात, पाटील धाब्याच्या मागील भागात सध्या अवैध पत्ता जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांची गर्दी वाढत असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असतानाही पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी दररोज सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या रकमेवर जुगार खेळला जातो. बाहेरगावाहूनही काही जुगारी येथे येत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परिसरातील शांतता भंग होत असून, युवकांमध्ये चुकीच्या प्रवृत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यासोबतच, काही नागरिकांनी हप्तेखोरीचा गंभीर आरोपही केला आहे. जुगार अड्डा चालवणाऱ्यांकडून नियमित हप्ते दिले जात असल्यामुळेच पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, प्रशासनाची निष्क्रियता संशयाला अधिक खतपाणी घालत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “अशा अवैध धंद्यांवर वेळीच लगाम न लावल्यास भविष्यात मोठे गुन्हे घडू शकतात,” असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ छापा टाकावा, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरात कायदा सुव्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे. …क्रमश;.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
