ऐनपूर – रावेर रस्ता बनला काटेरी मार्ग, अपघाताला देत आहेत निमंत्रण
ऐनपूर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपूर ते रावेर रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपे वाढले आहेत त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.परिसरातील ऐनपूर ते रावेर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे व गवत वाढले असल्याने रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही बाभळीची काटेरी झुडपे तोडावी तसेच या रस्त्याची संपूर्ण वाताहात झाल्याने दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.
ऐनपूर ते रावेर ११ कि.मी. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे व मोठे गवत वाढले असून त्यांनी अर्धा जास्त रस्ता व्यापला असून हा रस्ता जणू काटेरी मार्ग बनला आहे. आधीच रस्ता अरूंद त्यातच दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे तसेच रस्त्यावर जागोजागी पडलेले मोठमोठाले खड्डे यामुळे संपूर्ण रस्त्याची वाताहात झाली आहे. सदरच्या रस्त्याने शेतकरी शेतमजूर, रेल्वे प्रवाशी ये- जा करीत असतात. सदरच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर, ट्रक अशी अवजड वाहने ये- जा करीत असतात.नागमोडी वळणावर समोरचे वाहन दिसत नसून या ठिकाणी वाहनधारकांच्या नेहमी चकमकी होऊन किरकोळ अपघात होतच असतात. रस्त्यावरील काटेरी झुडपे तसेच रस्त्याची वाईट दुरावस्था यामुळे प्रवाशी, शेतकरी, व्यापारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.