नात्याला काळिमा : सख्ख्या भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार,प्रसूतीनंतर धक्कादायक वास्तव उघड
जळगाव,मंडे टु मंडे न्युज | माणुसकीला लज्जास्पद आणि पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातून समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद या गावामध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर एक भयानक वास्तव उजेडात आले. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नऊ महिन्यांपूर्वी स्वतःच्या सख्ख्या भावानेच या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावद येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ती गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना या पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिला. ती अविवाहित आणि अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे चौकशी केली आणि तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी पीडितेने दिलेली माहिती ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. तिने सांगितले की, तिच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर अत्याचार केला होता, ज्यातून ती गर्भवती राहिली.
ही घटना जून २०२५ मध्ये घडली होती असे पीडितेने आपल्या जबाबात सांगितले आहे. त्या दिवशी घरातील आई-वडील आणि इतर सर्व सदस्य शेतामध्ये कामासाठी गेले होते. घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत आणि एकटे पाहून नराधम भावाने आपल्या बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी ती शांत राहिली आणि त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्यानंतरही वारंवार तिला धमकावून तिच्यावर अत्याचार करणे सुरूच ठेवले.
रुग्णालय प्रशासनाला या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ म्हसावद पोलिसांना याबद्दल कळवले. पोलीस पथकाने रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच संशयित आरोपीने गावातून पळ काढला असून तो सध्या फरार आहे. म्हसावद पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे. तसेच, प्रशासनाकडून पीडित मुलीला वैद्यकीय मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या घटनेमुळे समाजमनात संतापाची लाट उसळली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

