दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज |‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीद खांद्यावर घेत, कायदा व सुव्यवस्थेसह समाजात शांतता नांदविण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. या संस्कृत ब्रीदवाक्याचा अर्थ “सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा (दुष्टांचा) नाश करणे/नियंत्रण करणे” असा होतो हे ब्रीदवाक्य महाराष्ट्रातील पोलिसांना समाजाच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहण्याची प्रेरणा देते, मात्र या ब्रिदाला तिलांजली देत, ड्युटी लावण्याच्या वादातून दोन कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी होऊन या हाणामारीत दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घडली. जखमी झालेल्या एका पोलिसावर धुळ्यात तर दुसऱ्या पोलिसावर चोपडा येथे उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी आपसात हाणामारी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या चार ते पाच वर्षांपासून दोन्ही पोलिस कर्मचारी कार्यरत असून गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये धुसफुस सुरू होती व शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून दोघा पोलिसांमध्ये अखेर वाद झाला . वाद इतका विकोपाला गेला की वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला मार लागला. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी हाणामारी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.पोलिस कर्मचाऱ्यांच्या आपसात झालेल्या हाणामारीचे मोठी चर्चा सुरू आहे.

