“सिद्धेश्वर हनुमान” शिरसाळा प्रवेशद्वारासाठी आमदार निधीतून ३० लक्ष रुपये मंजूर !
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिरसाळा येथील “सिद्धेश्वर हनुमान” मंदिराकडे जाणाऱ्या इंदोर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील प्रवेशद्वार एका कंत्राटदाराच्या भरधाव वाहन चालकाने बेजबाबदार पणे वाहन चालवून या प्रवेशद्वारला मोठा अपघात घडवून आणला व प्रवेशद्वाराची नासधूस केली. यातून अनेक हनुमान भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या व पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करून तसेच बोदवड मलकापूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी हनुमान भक्तांनी केली होती.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून शिरसाळा सिद्धेश्वर हनुमान मंदिर प्रवेशद्वार बांधकामासाठी सुमारे ३० लाख रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे आता लवकरच न भूतो न भविष्यती असे भव्य प्रवेशद्वार येथे होणार असल्याने हनुमान भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनीं दिली

