भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

jalgaonआरोग्य

सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सुरक्षा किट विना कचरा संकलन

नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी. डॉ.दीपक लोखंडे |
नशिराबाद नगरपरिषदेअंतर्गत घंटागाडीवर घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा संकलनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा किट उपलब्ध करून दिली जात नसून त्यांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

एकीकडे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असताना, प्रत्यक्षात कचरा संकलन करणारे कर्मचारी हातमोजे, मास्क, गमबूट आणि इतर सुरक्षासाहित्याविना काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घंटागाडीवरील कर्मचारी उघड्या हाताने आणि साध्या पादत्राणांमध्ये ओला-सुका कचरा तसेच काचेचे तुकडे व इतर घातक वस्तू हाताळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ (Solid Waste Management Rules, 2016) नुसार कचरा संकलन व हाताळणी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संबंधित ठेकेदाराने वर्षातून किमान दोन वेळा सुरक्षा किट उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या किटमध्ये हातमोजे, मास्क, गमबूट, गणवेश आणि आवश्यक सुरक्षासाहित्याचा समावेश असतो.

दरम्यान, कचरा संकलनाचे काम खासगी ठेकेदारामार्फत होत असल्यास सुरक्षा किट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र, या नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचेही अधोरेखित केले जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचऱ्यामध्ये धारदार वस्तू, काचेचे तुकडे, सुया तसेच संसर्गजन्य साहित्य असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सुरक्षासाहित्याविना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्गजन्य आजार किंवा अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमांचे पालन होत नसल्यास जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने दर्जेदार सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!