खिर्डी- गोलवाडा रस्त्याची दुर्दशा, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? विद्यार्थ्यांचे हाल,नागरिक त्रस्त
पुरी-गोलवाडा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील खिर्डी ते गोलवाडा जोडणारा मुख्य रस्ता पूर्णतः उखडला असून, “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता” असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे चिखल आणि पाण्याने भरतात. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना नित्याची झाली आहेत. रुग्णवाहिका, शालेय बस यांनाही मार्गक्रमण करणे दुरापास्त झाले आहे.
विद्यार्थ्यांचे हाल
पुरी, गोलवाडा, भामलवाडी, शिंगाडी परिसरातील शेकडो विद्यार्थी रोज या रस्त्यावरून शाळा-कॉलेजसाठी जातात. खड्ड्यांमुळे बस उशिरा पोहोचते, दोन्ही बाजूंनी नाला असल्याने समोरून गाडी आल्यास वाहान धारकास मोठी कसरत करावी लागते अनेकदा कपडे चिखलाने माखतात. अशी खंत निखिल महाजन गोलवाडा ग्रामस्थ यांनी व्यक्त केली.
गरोदर महिला, वृद्धांची परवड
या रस्त्याने रावेर, सावदा जाणाऱ्या गरोदर महिला वृद्ध नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे गाडीला जबरदस्त धक्के बसतात. अनेकदा प्रसूतीच्या वेळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही.
नागरिकांची मागणी लोकप्रतिनिधींनी सखोल लक्ष घालण्याची मागणी परीसरातून जोर धरत आहे. “निवडणुकीच्या वेळी नेते मोठमोठे वादे करतात, पण रस्ता करायला त्यांना वेळ नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी खिर्डी-गोलवाडा रस्त्याचे तातडीने काम करावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


