नशिराबादच्या गजबजलेल्या साती बाजार परिसरात अमली पदार्थ आढळल्याने खळबळ, ३.५ किलो गांजा सह २ लाख ५७ हजारांची रोकड जप्त, दोन आरोपी ताब्यात
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील गजबजलेल्या साती बाजार परिसरात पोलिसांनी कारवाई करून ३.५ किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत गांजा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बेकायदेशीररीत्या गांजा बाळगणे व विक्री करण्याच्या संशयावरून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेश भारत बाटुंगे (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव) आणि सुभाष सोमा मराठे (वय ६७, रा. नशिराबाद, साती बाजार चौक) अशी आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३.५ किलो गांजा तसेच २ लाख ५७ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
नशिराबाद येथील साती बाजार परिसर हा दररोज बाजारपेठ भरत असल्याने कायम गजबजलेला असतो. या परिसरालगतच सार्वजनिक वाचनालय असून, नागरिकांची या भागातून नेहमीच वर्दळ सुरू असते. त्यामुळे अशा गजबजलेल्या व सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ म्हणजेच गांजा आढळून येणे ही गावाच्या दृष्टीने निश्चितच चिंतेची बाब मानली जात आहे.
विशेषतः गजबजलेल्या व गावचा मुख्य भाग असलेल्या परिसरात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री किंवा बाळगणूक होत असल्यास त्याचा सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने या परिसरात अधिक प्रभावी गस्त, संशयित हालचालींवर लक्ष आणि अमली पदार्थविरोधी कारवायांना आणखी वेग देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नशिराबाद पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिस स्टेशनच्या एपीआय योगिता नारखेडे , पीएसआय प्रिया दातीर, एएसआय काझी, पोहेकॉ चंद्रकांत पाटील, पोहेकॉ प्रशांत विरणारे, पोहेकॉ अनिल देशमुख, पोहेकॉ गिरीश शिंदे, पोहेकॉ गुणवंत देशमुख, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे, पोकॉ सागर बीडे, पोकॉ प्रवीण लोहार आणि पोकॉ विठ्ठल मुंडे यांनी केली.
गजबजलेल्या बाजारपेठेत झालेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात पोलिसांनी अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण भूमिका घेण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

