अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरवर्तन ; संतप्त जमावाने पेटवली शिक्षकाची कार,जमाव आक्रमक, आरोपीला ताब्यात द्या च्या मागणी वरून पोलिसांवर दगडफेक ; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार
बोदवड. जि.जळगाव.मंडे टु मंडे न्युज | बोदवड तालुक्यातील जामठी येथे खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करून अयोग्य मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती समोर येताच संतप्त नागरिकांनी संशयित शिक्षकाच्या घराकडे धाव घेतली. यावेळी जमावाने त्याची कार पेटवून दिली. तसेच संशयिताला जमावाच्या ताब्यात देण्याच्या मागणीवरून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जामठी येथील खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने संशयित शिक्षकाच्या घराजवळ जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बोदवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले.
मात्र, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही जमावाचा संताप कमी झाला नाही. जमावाने घरासमोर उभी असलेली शिक्षकाची कार पेटवून दिली. त्यानंतर संशयिताला पोलिसांच्या वाहनातून खाली उतरवून आपल्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी संशयिताला सुरक्षितपणे तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही जमाव आक्रमक राहिल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांच्या कारवाईनंतर जमाव हळूहळू पांगला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा बंदोबस्त जामठी येथे दाखल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून गावातील तणाव निवळल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करत आहेत. तसेच जमावाकडून झालेल्या दगडफेक व वाहन जाळण्याच्या घटनेचीही चौकशी केली जात आहे.


