खळबळ : भुसावळ मध्ये गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरातील हंबर्डीकर चाळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने इतर दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. २ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संदीप मनोहर कोळेकर (रा. हंबर्डीकर चाळ) यांचा चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट आणि त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करताना वाद झाला होता. या वादाची कुरापत काढत बाबा चेंगट, कुंदन अनिल पठाडे आणि अन्य दोघांनी संदीप कोळेकर यांच्या परिसरात येऊन गोंधळ घातला. यावेळी चौघांपैकी एकाने गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केला, तसेच मुकेश सुरेश भोई या तरुणास मारहाण केली. या मारहाणीत मुकेश भोई यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी संदीप कोळेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एक रिकामी पुंगळी आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. तपासाला वेग देत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट व कुंदन अनिल पठाडे यांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

