खळबळजनक : जळगाव जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणीची नाशिक मध्ये हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | नाशिक येथील रथचक्र चौकापासून काही अंतरावरील वनसंपदा सोसायटीतील दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर जळगाव जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली.
ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असे असून ती मूळची अमळनेरची रहिवासी असल्याचे समजते. तरुणीवर वार होत असताना तिने बचावासाठी जोरजोरात आवाज दिला, त्यामुळे काही लोक मदतीला येण्याच्या आतच हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला.
ही तरुणी एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ चाकू आढळून आला असून प्राप्त माहितीनुसार तिच्यावर हल्ला करणारा तरुण तिचा मित्र होता. दोघांमध्ये सायंकाळी एका ठिकाणी चर्चादेखील झाली होती. इंदिरानगर पोलिसांनी चाकू ताब्यात घेऊन पंचनामा केला. वनसंपदा सोसायटीतील दत्त मंदिर परिसर रात्रीच्या वेळी तुलनेने शांत असतो. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीवर अचानक चाकूने सपासप वार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्ल्यानंतर तरुणीच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर धावले. त्यांनी तातडीने इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्यासह इंदिरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली होती. या निघृण हत्येमुळे वनसंपदा सोसायटीसह संपूर्ण इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


