बालविवाहातून अत्याचारित अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म,चाळीसगाव तालुक्यात खळबळ
चाळीसगाव,मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यात अत्याचाराच्या अनेक घटना घडत असून जळगाव जिल्ह्यातून आणखी एक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी या गावी येथे अवघ्या १४ वर्षे ७ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीने एका बालकाला जन्म दिला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या पतीसह सासू आणि आई-वडिलांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना सन २०२३ पासून १७ जुलै २०२६ दरम्यान वेळोवेळी घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन (वय १४ वर्षे ७ महिने, जन्मतारीख ०८/१२/२०११) असल्याची पूर्ण जाणीव असतानाही
पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आणि सासूने संगनमत करून तिचा विवाह संशयित आरोपी रोहिदास माळी याच्याशी लावून दिला.
विवाहानंतर संशयित आरोपी रोहिदास माळी याने पीडितेच्या संमतीशिवाय तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका बालकाला जन्म दिला. या गंभीर प्रकारानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. तिथून हा गुन्हा शून्य क्रमांकाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या प्रकरणी. १) रोहिदास माळी (पती, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव) …२). कलावतीबाई माळी (सासू, रा. रोहिणी, ता. चाळीसगाव) ३).. पीडितेचे वडील (नाव पूर्ण माहीत नाही, रा. जातेगाव, ता. नांदगाव) ४)… पीडितेची आई (नाव पूर्ण माहीत नाही, रा. जातेगाव, ता. नांदगाव). या चार जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२) (i), ६४(२) (m), ६५(१), ३(५) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६, १७आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९, १०, ११ अन्वये चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलिस करत आहेत.


