धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलीच्या आईचीच आरोपीला साथ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरांतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील भोईटे नगर परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार विनयभंग होत असताना मुलीने तिच्या आईला या बाबत सांगितले असता या कृत्यात पीडित मुलीच्या आईच आरोपीला साथ देत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला मयूर रमेश शिंपी (रा.कांचन नगर, जळगाव) आणि पीडितेच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी मयूर शिंपी पीडितेच्या घरी आला असता त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले असता, तिने तक्रार ऐकून न घेता तक्रार करण्या ऐवजी ‘उगाच काही सांगू नकोस’ असे म्हणून दुर्लक्ष करण्यास सांगितले.
वारंवार छळ, तरीही आईची आरोपीची पाठराखण,आईची भूमिका संशयास्पद
पुन्हा २८ फेब्रुवारी आणि १२ जून रोजी देखील असाच विनयभंग केल्याचा तसाच प्रकार घडला.तसेच या नंतरही दोन वेळा आरोपीने अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केले. पीडितेने विरोध केला तरी तिची आई आरोपीच्या बाजूने नेहमीच उभी राहत होती. अखेर पीडित मुलीने थेट शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून मयूर शिंपी आणि मुलीच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करत आहेत.

