भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

लॅब टेक्निशियन नसताना रिपोर्टवर सही, दोन रिपोर्ट मध्ये तफावत, डॉक्टर नसतानाही अहवाल… पॅथॉलॉजी लॅब साठी नियमावली

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर पॅथॉलॉजी लॅब कार्यरत असून, आरोग्य तपासण्यांसाठी नागरिकांचा त्यावर मोठा विश्वास आहे. मात्र, अलीकडील काळात अनेक लॅबमधून दिल्या जाणाऱ्या तपासणी अहवालांबाबत गंभीर बाबी समोर येत आहेत. काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये आवश्यक पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून रिपोर्टवर सही करण्यात येत असल्याचे आढळले आहे. तसेच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडूनच रिपोर्टवर सही करण्यात येते. बऱ्याच ठिकाणी एकच वेळी दोन ठिकाणाहून काढलेल्या रिपोर्ट मध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याने या पार्श्वभूमीवर पॅथॉलॉजी लॅबवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग नियमावली तयार करण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही पॅथॉलॉजी लॅबची संख्या झपाट्याने वाढली आहे. रक्त, मूत्र, बायोप्सी, हार्मोन अशा विविध तपासण्यांवरून उपचारांची दिशा ठरते.

डॉक्टर नसतानाही अहवाल
काही लॅबमध्ये प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्ट किंवा मान्यताप्राप्त डॉक्टर नसतानाही पात्रता नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी अहवाल दिले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही ठिकाणी तर लॅब टेक्निशियन किंवा अन्य
कर्मचाऱ्यांकडूनच रिपोर्टवर पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांची डिजिटल सही केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बऱ्याच ठिकाणी एकच वेळी दोन लॅब मधून काढलेल्या रिपोर्ट मध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता सविस्तर नियमावली तयार करण्यात येत आहे.

अशी असणार नियमावली
नियमावलीत पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही कोण करणार, त्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय असावी, लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण व प्रशिक्षण कसे असावे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार आहेत. तसेच पॅथॉलॉजी लॅबची रचना, स्वच्छता, सुरक्षितता आणि रुग्णांसाठी आवश्यक सोयी यांचाही समावेश या नियमावलीत करण्यात येणार आहे. लॅबमध्ये कोणती साधनसामग्री असावी, ती अद्ययावत आणि प्रमाणित असणे किती आवश्यक आहे, यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लॅबवर कारवाईची तरतूदही करण्यात येण्याची शक्यता आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पॅथॉलॉजी लॅबचे काम अत्यंत जबाबदारीचे असून, त्यावर कडक नियंत्रण आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे पॅथॉलॉजी सेवांमध्ये पारदर्शकता येईल, रुग्णांचा विश्वास वाढेल आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!