ऐनपूर महाविद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साहात साजरी
ऐनपूर, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अजने होते. प्राचार्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले कि, गणित हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वेळ मोजणे, पैशांचा हिशोब ठेवणे, अंतर मोजणे, तसेच विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र व संगणक विज्ञान या सर्व क्षेत्रांचा पाया गणितावर आधारित आहे. तसेच राष्ट्रीय गणित दिन आपल्याला हे शिकवतो की गणित केवळ आकड्यांचा खेळ नसून तार्किक विचारशक्ती वाढवणारे प्रभावी साधन आहे. आपण सर्वांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी.
गणित विभागाचे प्राध्यापक प्रा.एस.बी.महाजन यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला, इंग्लंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ जी. एच. हार्डी रुग्णालयात रामानुजन यांना भेटायला गेले असता त्यांनी आपण प्रवास केलेल्या टॅक्सीचा क्रमांक 1729 होता असे सांगितले. त्यावर रामानुजन यांनी 1729 हा विशेष क्रमांक आहे असे सांगितले कारण तो दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन घनसंख्यांच्या बेरजेने व्यक्त करता येतो. हा प्रसंग त्यांच्या अद्भुत बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. तसेच राष्ट्रीय गणित दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये गणित विषयावर आधारित बहुपर्यायी परीक्षा आयोजित केली. परीक्षा संपल्यावर द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाच्या विद्यार्थिनी वेदिका अनिल पाटील व गायत्री शरद बारबंद यांनी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.बी.महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.एस.एन.वैष्णव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रेयस पाटील, अनिकेत पाटील वं हर्शल पाटील यांनी परिश्रम घेतले.
