भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षक भरती घोटाळा : १२ कोटींचा भ्रष्टाचार ; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक,एसआयटी ची कारवाई

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एका शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीने अटक केली. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापराच्या संदर्भात एसआयटीच्या सायबर सेलने ही कारवाई केली. त्यांच्यावर तब्बल १२ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. तक्रारीच्या आधारे सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी विशेष तपास पथक करत आहे. तपासात असे दिसून आले की, शालार्थ ऑनलाईन प्रणालीचा बेकायदेशीरपणे वापर करून बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले होते. बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने या बनावट आयडीद्वारे वेतन आणि देणी काढण्यात आली, ज्यामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

या प्रकरणी आज रवींद्र शंकरराव काटोलकर यांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली . २०२१ ते २०२२ दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर असताना बनावट विद्यार्थी ओळखपत्रांची माहिती असतानाही त्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय पगार प्रस्ताव मंजूर केला आणि वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी सरकारचे नुकसान केल्याचे समोर आले.

आतापर्यंत २६ जणांना अटक
या घोटाळ्यात आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, लिपिक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक १० मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!