सुशील केडिया अखेर नरमला,”मोठी चूक झाली, मला माफ करा…”
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या तीस वर्षांपासून मी मुंबईत राहतो. पण मी मराठी बोलणार नाही, असं ट्विट करून मनसेला शिंगावर घेणाऱ्या शेअर मार्केटमधील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियोनॉमिक्स’ या ट्रेडिंग फर्मचे संस्थापक उद्योजक सुशील केडिया यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या ट्विटचे अनेक अर्थ निघतात, त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो.
मनसे सैनिकांनी वरळीतील विजयी मेळाव्याआधी खळखळट्याक आंदोलन करत केडिया यांचं ऑफिस फोडलं होतं. त्यानंतर आता केडिया यांनी माफी मागितली आहे.
मी तणावाखाली येऊन ट्विट केलं होतं. राज ठाकरेंबद्दल मला पूर्ण आदर आहे. मी ३० वर्ष मुंबईत राहतो. यावेळी मी सात भाषा थोड्याफार शिकल्या. मात्र, मराठी बाबत कायम माझ्या मनात दडपण होतं. इथं जेव्हा शुद्ध बोललं जातं, तेवढं बोलायला जमेल, असं मला वाटत नाही. माझा बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. इथं तसं वातावरण निर्माण झालं होतं. त्या तणावातून मी ते ट्विट केलं होतं.
आपलीच लोकं आपल्याचा दुखावतात, याची मला जाणीव झाली. मला माझी चूक कळाली. तुम्ही जर आम्हाला मराठी शिकण्यासाठी सहकार्य केलं तर आम्ही लवकर मराठी शिकू. माझ्या ट्विटचा अनेक अर्थ निघू शकतात. त्याबद्दल मी माफी मागतो, मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो. असं सुनील केडिया म्हणाले.
