भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयसामाजिक

“नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा” मराठीचा अपमान करतील त्यांना धडा शिकवाच. व्हिडीओ बनवू नका – राज ठाकरे

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वरळी डोममध्ये झालेल्या शिवसेना आणि मनसेच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मुंबई वेगळी करण्याचा कट असल्याचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. वरळीमधील कार्यक्रमात पहिल्यांदा भाषण करताना राज ठाकरेंनी आम्ही विरोध केल्यानेच हिंदीसंदर्भातील निर्णय मागे घेतला असं राज ठाकरे म्हणाले.

वरळी येथील शिवसेना आणि मनसेच्या उत्सव मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं. उद्धव ठाकरेंशी गळाभेट घेतल्यानंतर थेट राज यांनी भाषणाला सुरुवात केली. “सन्माननिय उद्धव ठाकरे! जमलेल्या माझ्या तमाम बंधू, भगिनींनो आणि मातांनो… खरं तर दोघांची भाषणं संपली ना एकत्र आरोळ्या ठोका! खरं तर आज मोर्चा निघाला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्च्याच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली,” असं म्हणत राज यांनी भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी मराठीचा अपमान करणाऱ्यांच्या कानाखाली लगावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलंय.

“कोर्टात सगळ्या गोष्टी इंग्रजीत होतात. केंद्रातच्या शिक्षण धोरणात, इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. दक्षिणेतली राज्य यांना विचारत नाहीत. महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली?” असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

आजचा मेळावा शिवर्तीर्थावर मैदानावर व्हायला हवा होता. पाऊस असल्याने अशाप्रकारची जागा मिळत नाही. बाहेर उभ्या असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रीनवर उरका,” असं राज ठाकरे म्हणाले. “मी मुलाखतीत म्हटलेलं, ‘कोणत्याही वादापेक्षा, कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.’ आज जवळपास मी आणि उद्धव 20 वर्षानंतर एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही. अनेकांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं,” असं राज ठाकरे म्हणाले.

“मी आधी म्हणालेलो त्याप्रमाणे, कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा! माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाडक्या नजरेनं कोणी पाहायचं नाही,” असा इशारा राज यांनी दिला.

मीरा रोड येथे मराठी बोलणार नाही असे म्हणणाऱ्या एका अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी अद्दल घडवली. त्याच्या कानशिलात लगावली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर या घटनेविरुद्ध स्थानिक अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. राज ठाकरे यांनी या घटनेचा आपल्या भाषणात उल्लेख केला. जे मराठीचा अपमान करतील त्यांना धडा शिकवाच. पण हे करताना व्हिडीओ बनवू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. प्रत्येक गोष्टीत कानाखाली मारायलाच पाहिजे असे नाही. पण जिथे मराठीचा अपमान होईल तिथे हे गरजेचेच आहे. ज्याच्या कानाखाली वाजेल त्याला समोरुन बोलू द्या. तुम्ही व्हिडीओ शेअर करु नका, असे राज ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!