दारू पिऊन शिक्षक शाळेत, बेवड्या शिक्षकाचे निलंबन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शाळेत वारंवार गैरहजर व शाळेत आले तर दारू पिऊन येत असलेल्या शिक्षकाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार गट विकास अधिकारी, पंचायत समिती धरणगाव यांनी शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे.
धरणगाव येथील कवठळ या गावाची जिल्हा परिषद शाळा दिनांक ६ ऑक्टोबर रोजी बंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. शाळेला कुलूप असल्याची माहिती संतप्त ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी, धरणगाव यांना दिल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली. केंद्र प्रमुखांनी संबंधित शिक्षकास नोटीस बजावली असता, ते शाळेत अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यानंतर गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख चांदसर व केंद्र प्रमुख पाळधी यांनी ९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष शाळेस भेट देऊन चौकशी केली.
ग्रामस्थ, पालक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सहशिक्षकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध वारंवार दारू पिऊन शाळेत येणे, वर्ग अध्यापन न करणे व शाळेतून अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहणे अशा गंभीर तक्रारी चौकशीदरम्यान नोंदवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तातडीने दखल घेत, संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यांच्या आदेशानुसार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती धरणगाव यांनी दि. १० ऑक्टोबर रोजी शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.


