गोदावरी स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तसेच गोदावरी फाउंडेशनचे सदस्य व हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील, महादेव हॉस्पिटल चे हृदयरोगतज्ञ डॉ. सिद्धेश्वर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. त्यानंतर क्रीडा ध्वज फडकावून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानंतर ग्रीन, ब्ल्यू, येल्लो व रेड हाऊसच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी “I Love Sports” या संकल्पनेवर आधारित फॉर्मेशन डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी रस्सीखेच स्पर्धाही घेण्यात आली असून विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन केले. “खेळातून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात,” असे त्यांनी नमूद केले.
या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी, गोळाफेक, क्रिकेट, बुद्धिबळ आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
