सूर्य कोपला ; उन्हाचा तडाखा, जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी, तरुणाच्या मृत्यूने खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या उन्हाळा सुरू आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तापत असल्याने तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी तर तापमानाने विक्रम मोडले आहेत. जळगाव जिल्ह्यात ही उष्णेने कहर केला असून उन्हाच्या तापमानाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका ३४ वर्षीय आनंदा भोई या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार आनंदा भोई यांच्यात उष्माघाताची लक्षणे आढळून आली असली तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.
पाचोरा येथे उष्माघाताने आनंदा नथ्थू भोई ( वय ३४, रा. जवाहर हाऊसिंग सोसायटी, बाहेरपुरा) या तरुणाला भोवळ आली आणि तो खाली कोसळला. आनंदा भोई हा तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळविक्री करत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि तो खाली कोसळला. त्याला तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

