भुसावळ तालुक्यातील शेत शिवारात काळाचा घाला! शेतात विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
वरणगाव, ता.भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी घडली. शेतात वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी लावलेल्या झटका उपकरणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत अशोक बाबूराव पाटील (वय ५६) आणि त्यांच्या पत्नी सरिता अशोक पाटील (वय ४८, रा. सुसरी, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सुसरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते दाम्पत्य
अशोक पाटील हे कुटुंबासह सुसरी येथे वास्तव्यास होते. शेती हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार होता. सोमवारी दुपारी ते पत्नी सरिता यांच्यासह आपल्या शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, शेतात काम करत असताना झटका उपकरणाच्या तारांच्या संपर्कात आल्याने दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाटील दाम्पत्याला तातडीने वरणगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
गावावर शोककळा
शेतीच्या कामासाठी शेतात गेलेल्या पती-पत्नीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सुसरी गावातील ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


