जेवण बनवून न दिल्याच्या रागातून मुलाकडून आईची हत्या; लोणच्याची बरणी डोक्यात मारून खुरप्याने वार, गावात खळबळ!
बोदवड. मंडे टु मंडे न्युज ||जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती येथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने आपल्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय अंदाजे ६३) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी त्यांचा मुलगा गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अलकाबाई वाघ या येवती येथे मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान, मृत महिलेचे नातू आकाश रविंद्र महाजन (वय २४) हे जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथे आपल्या मेव्हण्याकडे राहून मजुरी करतात.
रविवारी पहाटे सुमारे ५.०५ वाजता आकाश यांना त्यांचा भाऊ अनिकेत याने फोन करून आजीची हत्या झाल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच आकाश महाजन हे मेव्हणे धर्मराज शशिकांत पाटील यांच्यासोबत तातडीने येवती येथे पोहोचले.
पहाटे सुमारे ५.३० वाजता ते घरी पोहोचले असता, घरासमोर नागरिकांची गर्दी जमली होती. घरात जाऊन पाहिले असता अलकाबाई या रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती. यावेळी गणेश वाघ हा हातात खुरपे घेऊन जवळच बसलेला दिसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
लोणच्याची बरणी फोडून खुरप्याने वार केल्याचा आरोप
घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली फुटलेली लोणच्याची बरणी आणि शेतीकामासाठी वापरले जाणारे लोखंडी अवजार आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादी आकाश महाजन यांनी गणेश वाघ याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता, जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी मारली आणि त्यानंतर खुरप्याने वार केल्याचे त्याने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर आकाश महाजन यांनी बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. घरगुती कारणावरून झालेल्या या कथित हत्येच्या घटनेमुळे येवती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आरोपांमागील वस्तुस्थिती, घटनेचे नेमके कारण आणि तपासातील पुढील निष्कर्ष पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

