Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

जळगाव जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तडीपार ; यावल, भुसावळ परिसरात दहशत; रेल्वे प्रवाशांना लुटण्यासह सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद,

यावल.मंडे टु मंडे न्युज || जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले असून, यावल आणि भुसावळ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) हे तडीपारीचे आदेश जारी केले.

समशेर शहा सलीम शहा (वय २८, रा. बाहेरपुरा, चोपडा नाका, यावल) आणि समीर उर्फ भांजा रहेमान तडवी (वय २३, रा. तडवी कॉलनी, यावल) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यावल, भुसावळ शहरासह रेल्वे मार्गावरही या दोघांचा उपद्रव वाढला होता. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल व रोकड चोरणे, वाटसरूंना अडवून जबरी चोरी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, मारहाण आणि दमदाटी करून दहशत निर्माण करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद
या दोघांविरुद्ध लोहमार्ग भुसावळ, यावल आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यांत चोरी, लूटमार आणि विनयभंगाचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी यापूर्वी यावल पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ आणि १२९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, या कारवाईनंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांच्या कृत्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलीस अधीक्षकांकडून तडीपारीचे आदेश
यानंतर यावल पोलिसांनी दोघांविरुद्ध तडीपारीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर केला. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी प्रस्तावाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोघांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!