Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावरावेरसावदा

सावद्यातील शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक! ३२ लाख ४० हजारांना गंडा ; सायबर पोलिसांनी रोखले २७ लाख

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा बनावट आरोप; एटीएस आणि आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून शिक्षकाची फसवणूक

जळगाव/सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज || सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्य नागरिकांसह सुशिक्षित व्यक्तींनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. रावेर तालुक्यातील सावदा येथील एका ५३ वर्षीय शिक्षकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ३२ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई एटीएसचा पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून शिक्षकाला दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे भासवण्यात आले. या प्रकरणात जळगाव सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत फसवणुकीच्या रकमेपैकी २७ लाख रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे.

विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच आला पहिला फोन!

मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी संबंधित शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर ‘विशाल ठाकूर’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपण मुंबई एटीएसचा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे शिक्षकाच्या नावाचे सीमकार्ड असलेला मोबाईल आढळल्याचा गंभीर आरोप त्याने केला.

इतकेच नव्हे, तर शिक्षकाच्या आधार कार्डचा वापर करून उघडलेल्या बँक खात्यात दहशतवाद्यांनी सात कोटी रुपये जमा केले असून त्यातील अडीच लाख रुपये शिक्षकाने घेतल्याचा बनावट आरोपही करण्यात आला. या आरोपांमुळे शिक्षक प्रचंड घाबरले.

घरात कोंडून ठेवण्यास सांगितले; दर तासाला द्यावा लागत होता हिशेब!

भामट्यांनी शिक्षकांवर मानसिक दबाव टाकत त्यांना घरी जाऊन बंद खोलीत बसण्यास सांगितले. त्यानंतर ‘मनोजकुमार शर्मा’ नावाच्या कथित आयपीएस अधिकाऱ्याशी संपर्क करून दर तासाला आपल्या हालचालींची माहिती देण्याचे आदेश दिले. अटक होण्याची तसेच समाजात बदनामी होण्याची भीती दाखवून त्यांना पूर्णपणे मानसिक दडपणाखाली ठेवण्यात आले.

३० ऑक्टोबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉल करून शिक्षकांना बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला त्यांनी तीन लाख रुपये पाठवले. मात्र, भामट्यांचा पैशांसाठी तगादा सुरूच राहिला.

एसआयपी आणि बचत प्रमाणपत्रे मोडून ३२ लाख रुपये पाठवले!

वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे शिक्षकांनी आपली एसआयपी (SIP) आणि इतर बचत प्रमाणपत्रे मोडली. अटक टाळण्यासाठी आणि आपल्यावरील आरोप दूर होतील या आशेने त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३२ लाख ४० हजार रुपये भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले.

एवढी मोठी रक्कम उकळल्यानंतरही सायबर ठगांचे समाधान झाले नाही. शिक्षकांनी पाठवलेली रक्कम काळा पैसा असल्याचे सेबीच्या तपासात निष्पन्न झाल्याचा बनाव रचण्यात आला. तसेच पोलीस आणि ईडीची कारवाई होण्याची भीती दाखवत आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली.

संशय येताच सायबर पोलिसांत धाव; २७ लाख रुपये गोठवले!

२९ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने शिक्षकांना संशय आला. त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे २६ नोव्हेंबर रोजी विशाल ठाकूर आणि मनोजकुमार शर्मा या नावांचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून संबंधित बँकांशी संपर्क साधला. या तत्पर कारवाईमुळे फसवणूक झालेल्या ३२ लाख ४० हजार रुपयांपैकी तब्बल २७ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांनी काय लक्षात ठेवावे?

कोणताही पोलीस अधिकारी, एटीएस, सीबीआय किंवा ईडीचा अधिकारी व्हिडिओ कॉलवरून कोणालाही ‘डिजिटल अरेस्ट’ करू शकत नाही. अटक, चौकशी किंवा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहावे. अशा प्रकारचा फोन आल्यास घाबरून पैसे पाठवू नयेत आणि तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!